---Advertisement---
Local Bodies Elections 2025 : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालानंतर, महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या स्वराज्य या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. याबाबतची माहिती जळगाव महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ५ ऑगस्ट रोजी नाशिक येथे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर जिल्हयांतील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
नाशिकला बैठकीत आगामी निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ, त्यांची नेमणूक आणि प्रशिक्षण, आवश्यकतेनुसार मतदान यंत्रांची उपलब्धता आणि तपासणी, मतमोजणीसाठी योग्य केंद्रांची निवड आणि त्यांची तयारी व निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विभागांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत सूचना देण्यात आल्याचे ढेरे यांनी सांगितले.
टप्प्याटप्प्यांत निवडणुका
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संकेतांनुसार, निवडणुकांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, दिवाळीनंतर सर्वांत आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.