Indo-Pak tension: काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा संबंध असल्याचे उघड झाले होते. या संदर्भात भारताने बुधवारी पाकिस्तान आणि बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतीय लष्करी आणि नागरी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हाणून पाडला. बुधवारपासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत, ज्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. या संभाषणानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये असे म्हटले आहे की रुबियो यांनी भविष्यात संघर्ष टाळण्यासाठी रचनात्मक संवाद सुरू करण्यासाठी अमेरिकन मदतीची ऑफर दिली आहे.
जगातील सात सर्वात प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह G7 ने शुक्रवारी भारत आणि पाकिस्तानला थेट चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच G7 सदस्य कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपियन युनियनचे परराष्ट्र मंत्री आणि उच्च प्रतिनिधींनी दोन्ही देशांना त्वरित तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
G7 परराष्ट्र मंत्र्यांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि भारत आणि पाकिस्तान दोघांनाही जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन करतो. लष्करी कारवाईत वाढ हा प्रादेशिक स्थिरतेसाठी गंभीर धोका आहे.’
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘दोन्ही देशांच्या नागरिकांच्या सुरक्षेबद्दल आम्हाला खूप काळजी आहे. आम्ही तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन करतो आणि दोन्ही देशांना शांततेसाठी थेट संवाद साधण्यास प्रोत्साहित करतो. आम्ही घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि जलद आणि कायमस्वरूपी राजनैतिक तोडग्यासाठी आमचा पाठिंबा व्यक्त करतो.’ असे निवेदनात म्हटले आहे.