नवी दिल्ली : देशात मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या २०१६ मध्ये ४५२ इतकी होती, २०२२ मध्ये हा आकडा ८४,०१२ वर पोहोचला आहे. भारतीय स्टार्टअपचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे उद्गार वाणिज्य तसेच उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी संसदेत काढले आहेत. स्टार्टअप केवळ दिल्ली, मुंबई, बेंगळूर आणि चेन्नई यासारख्या महानगरांमध्येच सुरू केले जाऊ शकतात अशी धारणा आहे, परंतु याच्या उलट छोट्या शहरांमधूनही प्रभावी अन् उत्तम स्टार्टअप समोर आले असल्याचे गोयल यांनी नमूद केले.
सरकारने देशात नवोन्मेषी स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती तसेच यात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहित करण्यासाठी १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया हा पुढाकार सुरू केला होता. आता स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना आणि कर्ज हमी योजनेच्या माध्यमातून स्टार्टअप्सना विविध टप्प्यांमध्ये सहाय्य प्रदान केले जाते. राज्यांमधील छोट्या शहरांमध्ये तरुण-तरुणींकडून स्टार्टअप सुरू करण्यात आल्याचा उल्लेख गोयल यांनी केला आहे.
टीयर-२ आणि टीयर-३ शहरांमध्येही स्टार्टअपसाठी मोठया शक्यता आहेत. देशात युनिकॉर्नची संख्या वाढून आता १०७ झाली आहे. अमेरिका आणि अन्य मोठ्या देशांमध्ये स्टार्टअपची प्रणाली खूपच अगोदर सुरू झाली होती, परंतु भारतात यापूर्वीच्या सरकारने यासंबंधी विचार का केला नाही हे आम्हाला पहावे लागणार आहे. भारतात स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मागील ८ वर्षांमध्ये अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत असे गोयल म्हणाले.