नवी दिल्ली : किरकोळ महागाई दरात (Retail Inflation Data) मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये 6.83 टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आला आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यांच्या महागाई दरातही घट झाली आहे. इकॉनॉमिस्टच्या सर्वेक्षणातही किरकोळ महागाईत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
यापूर्वी जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली होती. सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचा दर आता RBI च्या 6 टक्क्यांच्या पातळीच्या खाली आला आहे, ही दिलासादायक बाब आहे.
सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या महागाई दरात मोठी घट झाली आहे. अन्नधान्य महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 6.56 टक्क्यांवर आला, जो ऑगस्टमध्ये 9.94 टक्के होता. मात्र, तरीही ग्रामीण भागातील जनतेला महागाईने हैराण केले आहे. ग्रामीण भागात किरकोळ महागाई दर 5.33 टक्के आहे, तर अन्नधान्याचा महागाई दर 6.65 टक्के आहे.
सप्टेंबर महिन्यात भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे भाज्यांचा महागाई दर ऑगस्टमध्ये 26.14 टक्के होता तो 3.39 टक्क्यांवर आला आहे. मात्र, डाळींच्या भाववाढीचे प्रमाण वाढले आहे. डाळींच्या महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 16.38 टक्के झाला आहे जो ऑगस्टमध्ये 13.04 टक्के होता.
किरकोळ महागाईच्या आकडेवारीत मोठी घसरण झाल्याने आरबीआयला मोठा दिलासा मिळाला आहे. महागाईबाबत, RBI ने 6 टक्के अंदाज वर्तवला होता. आरबीआयने महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2024-25 चे ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) चे लक्ष्य 4.5 टक्के ठेवले आहे.