सर्वसामान्यांना महागाईचा झटका; डाळींच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

तरुण भारत लाईव्ह । २३ मे २०२३। डाळ ही अशी एक गोष्ट आहे, जी प्रत्येक भारतीयाच्या  घरामध्ये दररोज शिजवली जाते. मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत आहे. ग्राहक विभागाची आकडेवारी पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर अशीच या आकडेवारींमध्ये वाढ होत गेली तर स्वयंपाकघरातून डाळ नक्कीच गायब होईल.

ग्राहकविषयक विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळींची सरासरी किंमत 116.68 रुपये होती. आता 18 मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही वाढून 118.98 रुपये इतकी झाली आहे. मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसेल. कारण त्यांचा महिन्याचा खर्च हा ठरलेला असतो. त्यामुळे महागाईमुळे त्यांचा हा खर्च बिघडण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात फक्त तुरीच्या डाळीच्या किमतीत वाढ नाही झाली तर मूग डाळ, उडीद आणि चण्याच्या डाळीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. मूग डाळीच्या किमतीविषयी सांगायचे झाले तर, 18 मे दरम्यान डाळींच्या किमतीमध्ये 107.29 रुपये ते 108.41 रुपयांची वाढ झाली आहे. तर उडीद डाळीच्या किमतीत 108.23 रुपये ते 109.44 रुपयांची वाढ झाली आहे. चण्याच्या डाळीच्या किमतीत 73.71 रुपये ते 74.23 रुपयांची वाढ झाली आहे.