मुंबई : पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता, असा गौप्यस्पोट करुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या शपथविधीवर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केले आहे. भाजपा आणि शरद पवारांची चर्चा झाली होती याचा मीही साक्षीदार आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची परवानगी होती. २०१९ च्या निकालाच्या अगोदर २०१६-१७ मध्ये राष्ट्रवादीचे ३ आणि भाजपाचे ३ प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. त्या नेत्यांची नावे सांगणार नाही. आम्ही चर्चेला बसलो होतो. पवारांच्या परवानगीने पहाटेचा शपथविधी झाला हे फडणवीसांनी म्हटलं त्यावर नक्कीच विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस कधीही कदापि चुकीची माहिती ठेवणार नाहीत. हे सांगितल्याने भाजपाच्या जागा वाढणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे.
२०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात. अजित पवार एवढे मोठे पाऊल कसं उचलू शकतात हे राष्ट्रवादीचे नेते बोलतात. सर्व प्रतिष्ठा पणाला लावून ते येतील असं कुणाला वाटत नाही. स्थिर सरकारच्या दिशेने आपल्याला जायचंय हे सातत्याने अजित पवार म्हणत होते. भिजत घोंगडे ठेऊन राज्यात स्थिर सरकार देऊ शकणार नाही असं पवार सातत्याने बोलत होते असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात २ गट असतील असे वाटत नाही. कारण अजितदादांचे जेव्हा भाषण ऐकतो त्यांच्या भाषणात पवारांचा उल्लेख आदराने नेहमीच केला जातो. शब्दातून सन्मान लक्षात येतो. अजित पवार-शरद पवार यांच्यात मतभेद असतील असं दुरान्वये वाटत नाही, असेही ते म्हणाले.