तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
जळगाव शहर व तालुक्यात शेकडो शाळा आहेत. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यात स्कूल बसेस व स्कूल व्हॅनच्या माध्यमातून विद्यार्थी वाहतूक होत आहे. विद्यार्थी वाहतूक सुरक्षेला विशेष महत्त्व देताना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, स्कूल व्हॅनची तपासणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून, जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. स्कूल बस व स्कूल व्हॅनची तपासणी वेळोवेळी करण्यात येणार असून, ही तपासणीत त्रुटी आढळ्यास संबंधित स्कूल बस अथवा स्कूल व्हॅन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या शहरातील विविध मार्गांवर धावणार्या स्कूल व्हॅन आणि बसची वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी प्रत्येक स्कूल व्हॅन आणि बसची तपासणी केली. ज्या स्कूल व्हॅन किंवा बसमध्ये आवश्यक बाबींची पूर्तता झालेली नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) श्याम लोही यांच्या नेतृत्वात मोटर वाहन निरीक्षक नितीन जठार, सहायक मोटर वाहन निरीक्षक निखिल गायकवाड, राहुल काळे आणि वाहन चालक लक्ष्मण आगलावे यांनी केली आहे.
या बाबींची होणार तपासणी
तपासणी झालेल्या वाहनांना तपासणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वाहनाची गती मर्यादा, आपत्कालीन दरवाजा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, बैठक व्यवस्था, दफ्तर ठेवण्यासाठीचा रॅक आदी बाबी तपासण्यात येत आहेत.