जळगाव । महानगरपालिकेच्या पाइपलाइन चोरी प्रकरणात गंभीर आरोपांनंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांची बदली केली आहे. ही कारवाई आमदार सुरेश भोळे यांच्या आरोपांनंतर करण्यात आली.
जळगाव शहरातील गिरणा पंपिंग प्लांटवरील जुनी पाइपलाइन चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. महापालिकेच्या अभियंत्याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यात शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचेही नाव समोर आले आहे.
पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, सुनील महाजन अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या आरोपांनंतर, पोलिस अधीक्षकांनी निरीक्षक महेश शर्मा यांची बदली करून त्यांच्या जागी संजय गायकवाड यांना नियुक्त करण्यात आली आहे.
या बदल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. तथापि, पोलिस अधीक्षकांनी घेतलेली ही कारवाई न्याय्य आणि पारदर्शक असल्याचे सांगितले जात आहे.