पुणे : राज्यात पावसाच्या आगमनासोबत गणरायाचे आगमन धुमधडाक्यात होत आहे. सर्वत्र गणरायच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहेत. पुणे शहरातील अनेक मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 10:23 प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून 8:30 वाजता निघाली. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.
यंदा दगडूशेठ गणपती मंडळाने राम मंदिराचा देखावा साकारला आहे. याच राम मंदिराच्या भव्य देखाव्यात लाडक्या बाप्पाची मुर्ती विराजमान झाली. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या मंदिराची प्रतिकृती साकारलेल्या मंदिरात बाप्पा विराजमान झाली. जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात आली.
गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज
पुणे शहरातील गणेश उत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्ही तैनात केले आहे. यामुळे २४ तास लक्ष ठेवता येणार आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी; मुंबई, कोकणात मुसळधार
गणेशोत्सवाला राज्यात अतिशय उत्साहात सुरुवात झालेली असतानाच आता पावसानंही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं अनेकजण आपआपल्या घरांतून लाडक्या बाप्पाला आणायला निघाले आहेत तिथं या मंडळींना वरुणराजाही साथ देताना दिसत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस पावसाचं हेच चित्र पाहायला मिळणार असून, रायगडसह संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पाऊस मनमुराज बरसताना दिसणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच मुंबई, नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यामध्ये पावसानं दमदार सुरुवात केली.
मुंबई, पुणे, पालगर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र पाऊस काहीशी विश्रांती घेताना दिसेल. सध्या मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे थेट परिणाम कोकणात पाहायला मिळत आहेत. ज्यामुळं कोकणातील घाटमाथ्यावरील भागामध्येही पावसाची दमदार हजेरी असणार आहे, तर तिथं सातारा आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावरही अशीच परिस्थिती असेल.