---Advertisement---
जामनेर : तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक येथील प्रदीप कडू चांदणे (वय ३२) याच्या खून प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितांची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संशयितांनीच प्रदीप याचा खून केल्याची तक्रार त्यांच्या पत्नी मंगला चांदणे यांनी केली असल्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. प्रदीप याचा खून आहे की अपघात, याबाबत पोलिस अजून कोणत्याही ठोस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. यासाठी संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
प्रदीप याचा मृतदेह व दुचाकी गावाजवळील एका शेताच्या बांधावर आढळली. पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. अपघातस्थळी पोलिस आणि फॉरेन्झिक टीमने पाहणी केली आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयितांची चौकशी सुरू
दरम्यान, या प्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी प्रदीप चांदणे यांचे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर दोन संशयितांविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितांची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









