मुंबई : मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. शेअर निर्देशांक दिवसभरातील नीचांकी पातळीवर घसरला आहे. सेन्सेक्स ५७,२०० आणि निफ्टी १६,८५० च्या पातळीपर्यंत घसरले आहेत. आयटी, मेटल, बँकिंगसह रिअॅल्टी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे.
शेअर बाजाराच्या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे, सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप रु. २५५.६४ लाख कोटींवर आले आहे.जे १७ मार्च रोजी रु. २५७.५९ लाख कोटी होते. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे १.९५ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
बाजार विक्रीमध्ये अदानी आणि बजाज समूहाचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक नुकसान करणारे ठरले. जगभरातील बाजारपेठांमधून नकारात्मक व्यवहार होणे, डॉलर निर्देशांक वाढणे तसेच जागतिक बँकिंग व्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. यामुळे शेअर निर्देशांक घसरले आहेत.आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, धातू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.