मुंबई : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025 ) हंगामात सोमवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी मोठा उत्साह निर्माण करणारी बातमी म्हणजे या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह संघात दाखल झाला आहे.
सध्या आयपीएल गुणतालिकेत रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचा संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स २ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. बंगळुरूने तीन सामन्यांपैकी दोन सामने जिकले व एक सामना गमावला, तर मुंबईने चार सामन्यांपैकी एक सामना जिंकला व तीन सामने गमावले आहे.
बुमराह शनिवारी बंगळुरू येथील सेंटर ऑफ बीसीसीआयच्या एक्सलन्समध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला. बुमराह तिथे जानेवारीपासून आपल्या पाठीच्या खालच्या भागात ताण-संबंधित अस्वस्थतेमुळे त्याचे पुनर्वसन करत होता. तो आता महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स सहकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून आपले पुनरागमन वेळापत्रक तयार करेल.
बुमराहच्या पुनरागमनाच्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुरुवातीला त्याची तंदुरुस्ती तपासण्यासाठी एक किंवा दोन सराव सामने खेळणे. तो सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ते करू शकला की मुंबई इंडियन्ससोबत करेल हे निश्चित होऊ शकले नाही. बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल शेवटची अद्ययावत माहिती ४ एप्रिल रोजी आली होती, तेव्हा तो पुन्हा मैदानात उतरण्यापूर्वी किमान आरसीबीविरुद्धच्या सामन्याला मुकेल असे वृत्त आले होते.
गत काही आठवड्यांपासून बुमराह बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या गोलंदाजीचा भार वाढवत होता आणि ४ एप्रिलपासून तो फिटनेस चाचण्यांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ असल्याचे समजते. बुमराह आपल्या पुनर्प्राप्तीबद्दल सावध आहे व तो पुन्हा मैदानात उतरण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त आहे याची खात्री करू इच्छित आहे. २८ जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडमधील भारताच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला लक्षात घेऊन हे केले जात आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएल २०२५ मध्ये चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये एक जिंकला व तीन सामने गमावले आहेत. बुमराहच्या अनुपस्थितीत सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथुर व अश्वनी कुमारला पदार्पणाची संधी दिली आहे. ट्रेंट बोल्ट व दीपक चहरने आक्रमणाचे नेतृत्व केले आहे व कर्णधार हार्दिक पांड्या हा दुसरा वेगवान गोलंदाजी पर्याय आहे.
बुमराहने २०१३ पासून मुंबई इंडियन्ससाठी आपले सर्व आयपीएल क्रिकेट खेळले आहे. गत काही वर्षांत १३३ सामन्यांमध्ये १६५ बळी टिपले आहेत. खेळायला सुरुवात केल्यापासून तो केवळ २०२३ मध्ये आयपीएल हंगाम गमावला होता, जेव्हा त्याला पाठीची दुखापत झाली होती.