लखनौ : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेत सोमवारी यजमान लखनौ सुपर जायण्ट्स (एलएसजी) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे.
सध्या दहा संघांच्या आयपीएल गुणतालिकेत लखनौ ८ गुणांसह तिसन्या स्थानावर आहे, तर पाच वेळचा विजेता सीएसके दोन गुणांसह तळाशी आहे. या सामन्यात सीएसकेच्या घसरणीला आळा घालण्यासाठी त्यांच्या फलंदाजांना उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. आयपीएलमध्ये सीएसकेने कधीही यापेक्षा वाईट काळ अनुभवला नाही, त्यांनी सलग पाच सामने कधीही गमावले नाहीत.
यात त्यांचा किल्ला असलेल्या चेपॉक येथे झालेल्या अभूतपूर्व तीन सामन्यांचा समावेश आहे. जर कोणी सीएसकेला संकटातून बाहेर काढू शकेल तर तो महेंद्र सिंह धोनी आहे, परंतु ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर त्याची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली, परंतु शुक्रवारी तो आपल्या गत सामन्यात संघाचे नशीब बदलू शकला नाही. सीएसकेचा सर्वोत्तम फलंदाज ऋतुराज गायकवाड नसल्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची वाटचाल अधिक कठीण होते.
चेन्नई सुपर किंग्ज संघात पॉवर हिटर नसणे, उत्कृष्ठ खेळाडूंना पाठीशी घालणे हा सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे. सलामीवीर रचिन रवींद्र व डेव्हॉन कॉनवे हे दोघेही चांगले फलंदाज आहेत, पण त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. गायकवाडच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर येणारा राहुल त्रिपाठी कामगिरी करण्यासाठी प्रचंड दबावाखाली असेल. संघाला अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडूनही अधिक फायदा घेण्याची आवश्यकता आहे.
शिवम दुबेला पॉवर-हिटिंगच्या आघाडीवर अधिक पाठिंबा हवा आहे आणि त्यासाठी धोनी स्वतः सर्वोत्तम स्थानावर आहे, परंतु फलंदाजी क्रमवारीच्या स्थितीत सतत बदल, यामुळे विश्वचषक विजेत्या कर्णधारासाठी काम कठीण होते. गत सामन्यात धोनी ९ व्या क्रमांकावर होता. आमचा संघ अजूनही हार मानणार नाही. कारण आमच्याकडे योग्य खेळाडू आहेत व त्यांच्या खेळण्याच्या शैलीबद्दल बरीच चर्चा आहे. आम्ही त्यांना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने खेळण्यास सांगू इच्छित नाही; त्यांच्यासाठी हे स्वाभाविक आहे, असे चेन्नई सुपरकिंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी म्हणाले.
तिकडे घरच्या मैदानाचा फायदा घेत लखनौ सुपर जायण्ट्स आवश्यक सातत्य मिळवून सलग चौथा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. मुख्य वेगवान गोलंदाजांना दुखापत झाल्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला त्यांची गोलंदाजी ही त्यांची सर्वात कमकुवत बाजू होती, परंतु शनिवारी येथे गुजरात टायटन्सवर गोलंदाजांनीच लखनौला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सच्या डावाच्या शेवटी धावांचा प्रवाह रोखण्यात आवेश खान, रवी बिश्नोई व शार्दुल ठाकूर हे यशस्वी झाले हे उल्लेखनीय आहे.
लखनौची खेळपट्टी पारंपारिकपणे संथ होती, ती फलंदाजीसाठी चांगली राहिली आहे व निकोलस पूरनसारख्या खेळाडूंसाठी ती अनुकूल आहे.शनिवारी अव्वल क्रमांकावर मिशेल मार्श नसल्यामुळे ऋषभपंतला फॉर्ममध्ये असलेल्या एडन मार्करामसोबत सलामीला संधी मिळाली. पंतनेसुद्धा वरच्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली, पण मार्शच्या पुनरागमनानंतर तो सलामीवीर म्हणून स्वतःला अधिक संधी देईल का? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज आतापर्यंत त्यांच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, त्यामुळे पंतला वरच्या क्रमांकावर पोहोचणे अधिक कठीण झाले आहे.