हैदराबाद : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात दुसन्या दिवशी म्हणजे आज, रविवारी दुपारच्या सत्रात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जबरदस्त फलंदाज व अनुभवी गोलंदाजांचा समावेश असलेल्या संतुलित संघ गत आवृत्तीतील उपविजेता सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. यंदा विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने हैदराबादचा संघ विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहे.
हैदराबादकडे ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन व हेनरिक क्लासेनसारखे तडाखेबंद फलंदाज असल्यामुळे संघ व्यवस्थापनाला दुपारच्या सत्रातील या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा असेल. जर कोणत्याही संघाने प्रथम फलंदाजी केल्यास ते ३०० धावांचा टप्पा गाठू शकतात आणि हैदराबादकडे असलेल्या ताकदीच्या जोरावर अशी कामगिरी होणे अपेक्षित आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर भारताचा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीचे पुनरागमन झाल्यामुळे हैदराबादच्या संघात भर पडेल अशी अपेक्षा आहे. अभिषेक व हेड यांचा अलिकडचा फॉर्म पाहता सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना जबरदस्त फटकेबाजी बघण्याची संधी मिळण्याची आशा आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या घरच्या मालिकेत इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात अभिषेकने केवळ ५४ चेंडूत १३५ धावा केल्या.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर वगळता रॉयल्सच्या गोलंदाजी विभागात काही स्थापित नावे असल्यामुळे रविवारी प्रथम फलंदाजी केल्यास सनरायझर्स हैदराबाद २५० पेक्षा जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू शकतात अशी शक्यता आहे.
संजू सॅमसन केवळ फलंदाजी करू शकतो
२०१६ चा विजेता सनरायझर्स हैदराबाद संघ राजस्थान रॉयल्सपेक्षा फलंदाजीच्या बाबतीत खूपच पुढे दिसत आहे. बोटाच्या दुखापतीमुळे कर्णधार संजू सॅमसनची उणीव भासणार नाही. सॅमसन यष्टिरक्षण व क्षेत्ररक्षण करू शकत नाही व केवळ बोटावर संरक्षण घेऊन फलंदाजी करू शकतो. तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला तर आश्चर्य वाटणार नाही. २००८ च्या विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाच्या पहिल्या तीन साखळी सामन्यांमध्ये फलंदाज रियान पराग हा अंतरिम कर्णधार असेल. इंग्लंडच्या जोस बटलरला संघाबाहेर केल्यानंतर, रॉयल्स संघाची फलंदाजीची बाजू थोडी कमकुवत झाली आहे. तरीही त्यांच्याकडे शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, नितीश राणा व यशस्वी जयस्वालसारखे दमदार खेळाडू अजूनही आहेत. हैदराबाद व राजस्थान संघ गत हंगामात एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळले होते. हैदराबादने दोन्ही सामने जिंकले होते, त्यामुळे या सामन्यातही त्यांना राजस्थान संघावर वर्चस्व गाजविण्याचा विश्वास असेल.
सनरायझर्स हैदराबादने गत हंगामात तीन वेळा २५० पेक्षा जास्त धावसंख्या उभारली होती, यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध अवे सामन्यात २८७ व घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावांचा समावेश होता. अभिषेक व हेड या स्फोटक जोडीने तिसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २६६ धावा काढत आयपीएलमध्ये सर्वाधिक १२५ धावा उभारल्या होत्या. कर्णधार पॅट कमिन्स व मोहम्मद शमी ही अनुभवी वेगवान जोडी गोलंदाजी विभागाची धुरा सांभाळतील, तसेच आणखी एक गोलंदाज अॅडम शॅम्पा हा फिरकी गोलंदाज आहे.