मुंबई : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) हंगामात रविवारी दुपारच्या सत्रात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जायण्ट्स (Lucknow Super Giants) यांच्यादरम्यान सामना खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आपला विजयी घोडदौड कायम ठेवून अव्वल चार क्रमांकातील आपले स्थान मजबूत करण्याचा, तर लखनौ अव्वल चार क्रमांकात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
मुंबई आणि लखनौचे प्रत्येकी १० गुण असून ते अनुक्रकमे चौथ्या व सातव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांच्यात केवळ नेट रन रेटचा फरक आहे. त्यांनी आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये प्रत्येकी पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. मुंबईचा नेट रन रेट ०.६७३ आहे, तर लखनौचा -०.०५४ आहे. वानखेडे स्टेडियमवर मैदानावर उष्णता व आर्द्रता वातावरणात हे दोन्ही संघ झुंजणार आहेत.
ऋषभपंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ आपला नेट रन रेट सुधारण्यास उत्सुक असेल. पंत आपल्या नेतृत्वाखाली मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम असेल अशी आशा आहे. यष्टिरक्षक-फलंदाज पंतने या हंगामात आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये केवळ १०६ धावा केल्या आहेत. तो फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची शक्यता आहे.
महागडा खेळाडू असलेल्या पंतवर येणारा दबाव व आयपीएल संघाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी यासारख्या ओझ्यांचा सामना करावा लागत असताना त्याच्या खेळाडूंनी आतापर्यंत त्याला चांगली साथ दिली आहे. परंतु आता पंतच्या संघासमोर मोठे व वेगळे आव्हान असेल. कारण यजमान मुंबई इंडियन्स येथील खेळपट्टीशी परिचित आहेत व सलग चार विजय मिळवून गुणतालिकेच्या पहिल्या भागात पोहोचले आहेत.
मुंबई योग्य वेळी शिखरावर
मुंबई योग्य वेळी शिखरावर आहे आणि फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट व हार्दिक पांड्यासारखे मुख्य खेळाडू भविष्यात मुंबई इंडियन्सच्या प्रतिस्पर्थ्यांसाठी खूप धोका निर्माण करतील. रोहितने चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन दणकेबाज अर्धशतके झळकावून आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याने गत दोन सामन्यांमध्ये नाबाद ७६ आणि ७० धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव व तिलक वमनि उत्तम कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्ससाठी एत जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे. तो दोन्ही भूमिकांमध्ये विश्वासार्ह पर्याय असल्याचे सिद्ध झाला आहे.