IPL 2025: भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने आयपीएल चे उर्वरित काळासाठी स्थगित केले होते. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणस्तव हा निर्णय घेत असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते. काल भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे भारत-पाकमधील तणाव थंडावला आहे.
दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा निर्णय झाल्यामुळे आयपीएल पुन्हा देशभरात सुरु होणार आहे. बीसीसीआयने सामने पुन्हा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. पुढील सामने केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात होणार आहे. या सामन्याची नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. दरम्यान आयपीएलचे अजून १६ सामने शिल्लक आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे आता केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात सामने होणार असल्याची माहिती आहे.
१६ सामने शिल्लक
आयपीएलच्या चालू हंगामात एकूण ५७ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, ५८ वा सामना मध्यंतरी थांबवण्यात आला. हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जाणार होते, जे २५ मे रोजी कोलकाता येथे संपणार होते. अशा परिस्थितीत, आता उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाईल. २०२१ च्या सुरुवातीलाही असेच दिसून आले होते, जेव्हा लीग हंगामाच्या मध्यात स्थगित करण्यात आली होती. कोरोनामुळे आयपीएल २०२१ स्थगित करण्यात आले. त्यानंतर उर्वरित सामने यूएईमध्ये झाले होते.