गुवाहाटी : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात आज, रविवारी येथे पाच वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यादरम्यान सामना खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ काहीसे गोंधळलेले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मात दिल्यामुळे ऋतुराज गायकवाडचा चेन्नई सुपर किंग्ज पूर्णपणे हादरलेला व गोंधळलेला आहे.
हंगामी कर्णधार रियान परागच्या राजस्थान रॉयल्सला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आता सीएसके येथे होणाऱ्या आपल्या पुढील आयपीएल सामन्यात तितक्याच गोंधळलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयाची आशा आहे.
कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने सीएसके संघातील काही त्रुटी उघडकीस आणल्या. आता त्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या खेळात सुधारणा करण्याची आशा आहे.
प्रथम फलंदाजी करताना १६५ ते १७० धावांचा बचाव करावा किंवा प्रतिस्पर्थ्यांना रोखून १५५ ते १६० धावांचा पाठलाग कराव, अशी सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना अपेक्षा आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे एम. एस. धोनी आता ९ व्या क्रमांकावर टेल-एंडर म्हणून ओळखला जात आहे. धोनीने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या.
आसाम क्रिकेट संघटना स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे, त्यामुळे सीएसकेला राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध विजय मिळवून देण्यास मदत होऊ शकते. सीएसकेकडे मजबूत फलंदाजी आहे, परंतु गोलंदाजी विभाग यावर्षी अव्वल दर्जाचा दिसत नाही.
मथिशा पाथिराणा व डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज नूर अहमद हे उत्तम आहेत. खलील अहमद हा एक नवीन गोलंदाज आहे, पण तो कधीकधी चांगली कामगिरी करतो. रविचंद्रन अश्विन आणि त्याचा दीर्घकालीन सहकारी रवींद्र जडेजा यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.
राजस्थान रॉयल्सकडे जोस बटलरसारखा एकही मोठा परदेशी फलंदाज नाही. तुषार देशपांडे आणि संदीप शर्माचा समावेश असलेला त्यांचा भारतीय गोलंदाजांचा समूह सुद्धा आत्मविश्वास निर्माण करत नाही. राजस्थानकडे गुवाहाटीच्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी दर्जेदार फिरकी गोलंदाज देखील नाही. थोडक्यात, दोन कमकुवत संघांच्या लढाईत सीएसकेचे पारडे थोडे जड आहे.