IPL 2025 Schedule : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही मोठी बातमी आहे. यंदाच्या हंगामातही 10 संघ स्पर्धेत सहभागी होणार असून, एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.
IPL 2025 स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर 22 मार्च रोजी रंगणार आहे. या सामन्याने क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक पर्वाची सुरुवात होणार आहे.
यंदाच्या हंगामातही काही दिवस डबल हेडर्स म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) संघात दुपारी हैदराबाद येथे लढत होईल, तर संध्याकाळी क्रिकेटप्रेमींसाठी सुपर हिट सामना पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगेल.
हेही वाचा : दोन बायका अन् फजित ऐका, असा ठरला तिघांचा फॉर्म्युला!
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ नेहमीच हिट ठरतात. यंदाच्या हंगामात 20 एप्रिल रोजीही हे दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
यंदाच्या वेळापत्रकानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना फक्त एकदाच खेळवला जाणार आहे. हा सामना 7 एप्रिल रोजी होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघ त्यांच्या पहिल्या चार सामन्यांसाठी घरच्या मैदानावर राहणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर त्यांच्या चाहत्यांना हा थरार अनुभवता येणार आहे.
IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघ त्यांचे दोन घरचे सामने गुवाहाटी येथे खेळणार आहे, तर पंजाब किंग्स संघ त्यांचे दोन घरचे सामने धरमशाला येथे खेळणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी नवे मैदान आणि नवीन रोमांचक अनुभव मिळणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर IPL चा थरार
9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर अवघ्या 12 दिवसांत IPL 2025 ला सुरुवात होत आहे. एकूण 12 ठिकाणी हा हंगाम खेळला जाणार आहे. स्पर्धा होम आणि अवे प्रकारात होणार असल्याने चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघाचे सामने त्यांच्या शहरात पाहायला मिळतील.
ग्रँड फिनाले 25 मे रोजी
IPL 2025 चा अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम लढतीसाठी कोणते दोन संघ भिडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी पूर्णपणे थरारक ठरणार आहे. खेळाडूंच्या लिलावानंतर संघ अधिक मजबूत झाले असून, आता क्रिकेटच्या या महासंग्रामाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.