IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचताच आरसीबी संघात एका नवीन खेळाडूची एन्ट्री झाली आहे. हा तो खेळाडू आहे ज्याने पाकिस्तानला लोळवले होते. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे टिम सेफर्ट. न्यूझीलंडचा हा यष्टीरक्षक फलंदाज जेकब बेथेलच्या जागी खेळणार आहे.
आरसीबीने टिम सेफर्टला किती पैसे दिले?
प्लेऑफपूर्वी आरसीबीमध्ये सामील होणारा टिम सेफर्ट हा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीही संघात सामील झाला आहे. आरसीबीने टिम सेफर्टला २ कोटी रुपयांत संघात सामील केले आहे.
टिम सेफर्ट याने पाकिस्तानला घरच्या मैदानावर झालेल्या टी-२० मालिकेत धुवाधार धुतले होते. पाकिस्तान संघ मार्चमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यावेळी न्यूझीलंडने ती मालिका जिंकली होती, ज्यामध्ये टिम सेफर्ट विजयाचा नायक होता.
टिम सेफर्टने त्या मालिकेत सर्वाधिक २४९ धावा केल्या, त्याची सरासरी ६२ पेक्षा जास्त होती आणि स्ट्राईक रेटही २०० च्या वर होता. सेफर्टने २२ षटकार आणि २० चौकार मारले होते. म्हणूनच टिम सेफर्टला पाकिस्तानला लोळवणारा खेळाडू, असे म्हटले आहे.
टिम सेफर्टच्या एकूण टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त, त्याला PSL, ILT20, BBL, CPL, LPL आणि T20 ब्लास्ट तसेच IPL मध्ये 2 संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल सामने खेळले आहेत.
तथापि, यावेळी तो आरसीबीशी संबंधित आहे, जो बीसीसीआयच्या टी२० लीगमधील त्याचा तिसरा संघ असेल. आरसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो २४ मे पर्यंत संघात सामील होईल.