कोलकाता : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात मंगळवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायण्ट्स यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे.
दुपारच्या सत्रात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात सुनील नरेन त्याचा क्लोन व सर्वात मोठा चाहता दिग्वेश राठी याच्याशी सामना करेल. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांची स्थिती सारखीच असून दोघांचेही प्रत्येकी दोन विजय व चार गुण आहे. सरस धावगतीच्या आधारे कोलकाता पाचव्या स्थानी, तर लखनौच सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये अव्वल चार क्रमांकात स्थान मिळविण्यासाठी जोरदार चुरस असेल.
घरच्या केकेआर संघासाठी आतापर्यंतचा हा मिश्र पुनरागमनाचा हंगाम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व मुंबई सुरुवातीच्या पराभवानंतर केकेआरने आपल्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या मध्यफळीच्या पुनरुज्जीवनानंतर केकेआर पुन्हा फॉर्ममध्ये परतला. त्यांचा सर्वात महागडा खरेदीदार व्यंकटेश अय्यर अखेर विजयी झाला, तर रिंकू सिंग व अनुभवी अजिंक्य रहाणेने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आशादायक तरुण खेळाडू अंगकृश रघुवंशीनेही आपल्या प्रवाहीपणा व अभ्यासू तंत्राने लक्ष वेधले, परंतु वाईट सलामी भागीदारी अजूनही केकेआरसाठी चिंतेचा विषय आहे. क्विंटन डी कॉक व सुनील नरेन या सलामीवीर जोडीला संघर्ष करावा लागला आहे. राजस्थान विरद्धच्या सामन्यात तेवढी डी कॉकने ९७धावांची खेळी केली होती, परंतु अन्य सामन्यात त्याला संघर्ष करावा लागला, त्यामुळे त्याच्या शीर्षस्थानी असलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. डी कॉकसोबत रघुवंशीला पदोन्नती दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.
सुनील नरेन वि. दिग्वेश राठी
सुनील नरेनचे महत्त्व केवळ धावा काढण्यापुरते मर्यादित नाही याची केकेआरला कल्पना आहे. सुनी व दिग्वेश हे विरुद्ध संघात असल्याने कोण कोणावर मात करतो, हे बघणे मनोरंजक असेल. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरीनंतर दिग्वेश राठी आता आपल्या क्रिकेट स्वप्नाला आकार देणाऱ्या खेळाडूंविरुद्ध खेळत आहे. सुनील नरेनला पाहिल्यानंतर मला गोलंदाजीची आवड निर्माण झाली. मला नरेनसारखे शांत राहून फलंदाजांवर आक्रमण करायचे आहे व कठीण परिस्थितीत निर्भय राहायचे आहे.
आतापर्यंत चार सामन्यांमध्ये राठीने ७.६२ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने सहा बळी घेतले आहे. राठीची गोलंदाजी प्रशंसनीय असली तरी, मैदानावरील त्याचे सेलिब्रेशन वादग्रस्त ठरले आहे. त्याला आधीच दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्यावर आता तीन डिमेरिट पॉइंट्स आहेत. एका सामन्याच्या निलंबनापासून तो एक डिमेरिट गुण दूर आहे.
लखनौमध्ये मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास बळावलेला लखनौचा संघ आपल्या विजयाची लयच कायम राखण्यास उत्सुक असेल. मुंबईविरुदाध मिचेल मार्श व एडन मार्करामने प्रभावी अर्धशतक झळकावून आपण फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे. तथापि, आयपीएलमध्ये ऋषभ पंतच्या आतापर्यंतच्या वाईट कामगिरीमुळे चाहते व तज्ज्ञांकडून आधीच टीका होत आहे. विक्रमी २७ कोटी रुपयांना खरेदी केल्यानंतर लखनौ सुपर जायण्ट्सच्या कर्णधारावर दबाव वाढत आहे.