हैदराबाद : अठरगाव्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025 ) हंगामात रविवारी राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान सामना खेळला जाणार आहे. चार सामन्यातील पराभवच्या हॅट्ट्रिकमुळे अस्वस्थ असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ आता गुजरात टायटन्सविरुद्धच्या आपल्या पाचव्या आयपीएल सामन्यात घरच्या मैदानावर विजय नोंदवण्यास उत्सुक असेल.
शुभमन गिलचा गुजरात टायटन्स तीन पैकी दोन सामने जिंकत ४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर गत वर्षीचा उपविजेता हैदराबाद संघ सध्या दहा संघांच्या आयपीएलच्या गुणतालिकेत २ गुणांसह तळाशी आहे. अनेक विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ अपयशी ठरत आहे. पहिल्या सामन्यात २८६ धावा करून स्पर्धेची सुरुवात दमदारपणे केल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने पुढील तीन सामन्यांमध्ये १९०, १६३ आणि १२० धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायण्ट्सविरुद्धच्या सामन्यातही हैदराबदला पराभव पत्करावा लागला होता.
आता हैदराबाद संघाला जोरदार मुसंडी मारण्यासाठी आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे, कारण गत तीन सामन्यांमध्ये त्यांचे बहुतेक स्टार फलंदाज अपयशी ठरले व त्यांना आक्रमकतेमध्ये योग्य संतुलन साधता आले नाही. आता हैदराबादसाठी दिलासादायक बाब म्हणजे फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या उप्पल स्टेडियमवर ते पुन्हा मैदानावर उतरणार आहे.
हैदराबाद संघाचे स्पर्धेत आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीने त्यांच्या फलंदाज व गोलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागणार आहे. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी व हेनरिक क्लासेनला फलंदाजीत आणि मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, हर्षल पटेलला गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे, अन्यथा आणखी एक पराभव त्यांना परतीच्या बिंदूकडे ढकलू शकतात. युवा लेग-स्पिनर झिशान अन्सारी वगळता कोणताही गोलंदाज धोकादायक दिसत नाही.
दुसरीकडे, गुजरात टायटन्स हळूहळू वेग पकडत आहे. ते अव्वल चार क्रमांकात आपले स्थान मजबूत करण्यास उत्सुक आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या शानदार विजयानंतर फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ जोस बटलरने जोरदार खेळ केला आहे.
बी. साई सुदर्शनने कर्णधार शुभमन गिल व बटलरसह अव्वल स्थानावर मजबूती आणल्यामुळे गुजरात टायटन्सची फलंदाजी मजबूत दिसत आहे. शेफेन रदरफोर्ड व राहल तेवतिया हे मधल्या फळीत दोन मोठे गोलंदाज आहेत. शाहरुख खान हा एकमेव कमकुवत दुवा दिसत आहे. तथापि, टायटन्सचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे.
त्याच्या अनुपस्थितीमुळे त्यांना अडचणी येतील. आगामी सामन्यासाठी रबाडाची जागा कोण घेईल हे बघणे मनोरंजक असेल. जर टायटन्स आपल्या फलंदाजीला बळकटी देऊ इच्छित असेल, तर ग्लेन फिलिप्स उत्तम पर्याय आहे. तो ऑफ स्पिन गोलंदाजी सुद्धा करतो. तो सध्या जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. हाच स्पष्ट पर्याय असावा.
तथापि, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी व अफगाणिस्तानचा करीम जनत याचा विचार केला जाऊ शकतो. गोलंदाजीत मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णावर जबाबदारी असेल. रशीद खान व आर. साई किशोरचे ही प्रयत्न महत्त्वपूर्ण असेल.