IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावामुळे थांबलेली आयपीएल २०२५ स्पर्धा १५ किंवा १६ मे पासून पुन्हा सुरू होऊ शकते. विदेशी खेळाडूंनाही याची माहिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
ऑस्ट्रेलियन वेबसाइट कोडस्पोर्ट्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गुरुवार १५ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होऊ शकते, ही माहिती विदेशी खेळाडूंना देण्यात आली आहे. याबाबत आज बीसीसीआयची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, युद्धविरामातील नवीन घडामोडींमुळे, बीसीसीआय, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल अधिकारी यांच्यासोबत आज ११ मे रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रानुसार, १५ किंवा १६ मेपर्यंत आयपीएल पुन्हा सुरू होऊ शकेल. बीसीसीआय आता उर्वरित वेळापत्रकात सुधारणा करेल. परिस्थिती सामान्य झाल्याने धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळविता येतील.
विदेशी खेळाडू परत येतील ?
बीसीसीआयला विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचा प्रश्न भेडसावू शकतो. ९ मे रोजी आयपीएल आठवड्यासाठी स्थगित केल्यानंतर लगेचच, खेळाडू, समालोचक आणि सपोर्ट स्टाफसह सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. युद्धबंदी झाली तरी काही खेळाडू अजूनही परतण्याबाबत घाबरत असतील. विदेशी खेळाडू घाबरले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद होण्याच्या भीतीमुळेच त्यांच्यात घबराट निर्माण झाली होती, असे एका सूत्राने सांगितले. विदेशी क्रिकेटपटू भारतात परत येतील, असा विश्वास आयपीएल चेअरमन अरुण धुमल यांना आहे.
ते म्हणाले की, विदेशी खेळाडूंना भारतात परतण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अशा तणावपूर्ण परिस्थितीत विदेशी क्रिकेटपटूंचे मायदेशी परत जाणे स्वाभाविक होते. परंतु आता परिस्थिती सामान्य झाली आहे. मला खात्री आहे की विदेशी खेळाडू परत येऊन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छितात. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानुसार संघ मालकांसह सर्व भागधारकांना माहिती देणार आहोत.