Chopda : शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले.
याबाबत दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना सदर प्रकार भ्रमणध्वनीवरून कळविला.अमृतराज सचदेव यांनी तात्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सदर बाब कळविली. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांनी धाव घेत असता त्यांना ते संशयितरित्या तोतयागिरी करताना आढळले.
फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन व त्यांच्यासोबत असलेले सचिन अरुण पाटील यास ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवून आरोपी व सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते (वय 35 राहणार साकटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर), विनायक सुरेश चवरे (वय 35 राहणार 721 गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जर वाडा जिल्हा सोलापूर),लक्ष्मण ताड (पूर्ण नाव गाव माहित नाही)अशा तीन आरोपींनी फिर्यादी कडून पाच लाख रुपये खंडणी मागितली व आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली.म्हणून त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम 170,384,419,34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घडल्याचे ठिकाणी भेट दिली असून आरोपीच्या ताब्यातील चार चाकी वाहन ही जप्त केलेले आहे.
सदर वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली असून खंडणी कामी वापरले असल्याचे तपास अधिकारी अजित सावळे यांनी सांगितले.
मंत्रालय स्तरावरून पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव
सदर तोतयेगिरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये यासाठी मुंबई येथील मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातुन जवळपास २० ते २५ वेळा पोलीस अधिकाऱ्यांना माझ्यासमोर फोन आले व गुन्हा दाखल करू नका असे पत्रकारांना अमृतराज सचदेव यांनी सांगितले.
तोतया अधिकारी व सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी राहुल शिवाजी देवकाते यांचे नात्याने साडू असलेले पोलीस निरीक्षकांचाही तपास अधिकारी यांच्या भ्रमणध्वनी वर अनेक वेळा भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून फिर्यादीस फिर्याद बदलणे सांगून गुन्हा दाखल करू नका असे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच या खंडणी प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी दिली आहे.पुढील तपास अधिकारी अजित सावळे हे करीत आहेत.