उन्हाळ्यात अंडी, चिकन आणि मासे खाणे योग्य आहे का?

Summer Food : उन्हाळा आला असून या काळात अनेक जण  प्रथिनेयुक्त पदार्थांकडे दुर्लक्ष करतात. अर्थात अंडी, चिकन आणि मासे याकडे.  कारण ते शरीरासाठी “उष्ण” मानले जातात;  याबाबत आहारतज्ज्ञ  काय सांगतात  जाणून घेवूया.

अंडी, कोंबडी आणि मासे खाणे आवश्‍यक, पण..
 आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी याबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, ‘उन्हाळ्यात  अंडी, चिकन आणि मासे हे अन्नपदार्थ कमी प्रमाणात असले तरी ते खाणे आवश्‍यक आहे.

नमामी अग्रवाल व्हिडिओमध्ये पुढे असं म्हणतात की, हे पदार्थ आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. हे पदार्थ तुमची उर्जा पातळी उच्च ठेवण्यासाठी विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देत असतात. अंडी विशेषत: शरीरात उष्णता निर्माण करतात; परंतु जर ते कमी प्रमाणात खाल्ले तर ते उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ ठरू शकतात.

याशिवाय, अंडी, चिकन आणि मासे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हृदयाचे आरोग्य सुधारतात, रक्तदाब नियंत्रित करतात आणि निरोगी हाडे आणि दात वाढवतात. हे सर्व पदार्थ पौष्टिक आहेत.