नवी दिल्ली : देशाची ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ (NIA) भारताच्या दक्षिण भागात ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) च्या प्रशिक्षण केंद्रांचा पर्दाफाश करण्यात व्यस्त आहे. या अंतर्गत, NIA ने दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी तामिळनाडूमधील कोईम्बतूर, चेन्नई आणि तेलंगणासह सुमारे ६० संशयित ISIS केंद्रांवर छापे टाकण्यास सुरुवात केली.
ISIS च्या कट्टरता आणि भरती प्रकरणी NIA ने तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये ३० ठिकाणी छापे टाकले. कोईम्बतूरमध्ये २१ ठिकाणी, चेन्नईमध्ये ३ ठिकाणी, हैदराबाद आणि सायबराबादमध्ये ५ ठिकाणी आणि तेनकासीमध्ये १ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी कोईम्बतूरमध्ये कार बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात, ISIS मॉड्यूलचे नवीन पुरावे मिळाल्यानंतर, NIA त्याच्याशी संबंधित लोकांच्या स्थावर मालमत्तांवर छापे टाकत आहे. तो कोईम्बतूर येथील संशयितांशी संबंधित असू शकतो. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये ISIS आणि त्यांचे एजंट तरुणांना अडकवून कट्टर इस्लामी दहशतवादासाठी शस्त्रे बनवत आहेत, हे विशेष. गेल्या वर्षी त्यांनी कोईम्बतूरमध्ये कार बॉम्बस्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. एनआयए आता या दहशतवाद्यांवर आपली पकड घट्ट करत आहे.
भारतीय आणि विदेशी चलनासह अनेक डिजिटल उपकरणे जप्त
तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये, कोवई अरेबिक कॉलेजच्याजवळ एनआयएने शोध घेतला. कॉलेजमध्ये शिकणाऱ्यांची आणि त्याच्याशी संबंधितांची घरे एनआयएच्या तपासाच्या कक्षेत आली आहेत. कोईम्बतूर कॉर्पोरेशन द्रमुकच्या नगरसेवकाच्या पतीचीही चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशी केल्यानंतर काही तासांतच एनआयएचे अधिकारी नगरसेवकाच्या घरातून निघून गेले.
एनआयएने या छाप्यात भारतीय आणि विदेशी चलनी नोटांसह अनेक डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “शोधादरम्यान भारतीय चलनातील ६० लाख रुपये आणि यूएस डॉलर १८,२००, तसेच स्थानिक आणि अरबी भाषेतील अनेक पुस्तके देखील जप्त करण्यात आली आहेत.” हे प्रकरण “निरपराध तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी लोकांच्या एका गटाने केलेल्या गुप्त मोहिमेशी संबंधित आहे.”
तसेच अरबी भाषेचे वर्ग आयोजित करण्याच्या नावाखाली कट्टरतावादी कारवाया केल्या जात होत्या. NIA अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यांसारख्या मोबाइल अॅप्लिकेशन्सद्वारे अशा कट्टरतावादी क्रियाकलापांचा ऑनलाइन प्रसार केला जात होता.एनआयएच्या तपासात ISIS प्रेरित एजंट खिलाफत विचारसरणीचा प्रचार करत असल्याचे समोर आले आहे. ही विचारधारा भारताच्या धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या घटनात्मक तत्त्वांना घातक आहे.
NIA अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “या प्रकरणात गुंतलेल्या लोकांनी कट्टरपंथी बनवण्याचा आणि तरुणांची भरती करण्याचा कट रचला होता, जे नंतर दहशतवादी आणि बेकायदेशीर कृत्ये आणि क्रियाकलापांमध्ये सामील असल्याचे आढळून आले. “असाच एक दहशतवादी हल्ला ऑक्टोबर २०२२ च्या कोईम्बतूर कार बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे.”