कासोदा : एरंडोलकडून भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकरने एका पायी चालणाऱ्या इसमाला जबर धडक दिली. या अपघातातील जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी रात्री घडली. योगेश चंद्रकांत देशमुख (४८) असे मृत इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील भावे नगरमधील रहिवासी योगेश चंद्रकांत देशमुख (४८) हे दररोज रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी रस्त्याच्या कडेवर चालत असे. दरम्यान, ८ रोजी रात्री जेवणानंतर फिरायला गेले असता एरंडोलकडून भरधाव वेगात येत असलेल्या एम.एच. १७ बी.डी. ७७२२ या क्रमांकाच्या दुधाच्या टँकरने त्यांना जबर धडक दिली.
या अपघतात योगेश चंद्रकांत देशमुख (४८) यांच्या डाव्या पायावरुन टँकरचे चाक गेल्याने गंभीर दुखापत झाली. त्यात योगेश देशमुख हे गंभीर जख्मी झाल्याने त्यांना जळगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर टँकर चालक घटना स्थळावरून टँकरसह कासोदा पोलीस ठाण्यात हजर झाला. मयत योगेश देशमुख हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता व घरातील कर्ता पुरुष होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुलं असा परिवार आहे.
योगेश देशमुख यांच्यावर आज दि. ९ एप्रिल रोजी दुपारी दिड वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत पाळधी येथील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रताप पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक मुस्लिम बांधवसह उपस्थित होते.