चांद्रयान ३ च्या लाँचिंगपूर्वी इस्रोचे अधिकारी तिरुपती मंदिरात

तिरुपती : भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ चंद्राकडे झेपायला सज्ज असून १४ जुलैला दुपारी २.३५ वाजता होणाऱ्या उड्डाणाकडे अवघ्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे. भारताची ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी देश प्रार्थना करत आहेत. दरम्यान, इस्रोचे अधिकारी आज तिरुपती वेंकटचलापथीच्या मंदिरात दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी पोहोचले आहेत. वैज्ञानिकांच्या एका टीमने चांद्रयान ३ चे लहान मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात पूजा केली.

इस्रोच्या वैज्ञानिकांनी आज तिरुपती वेंकटाचलापथी मंदिरात चांद्रयान ३ चं प्रतिकृती मॉडेल घेऊन पूजा-आरती केली. तसेच, भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थनाही केली. यावेळी, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हेही मंदिरात हजर होते. दरम्यान, यापूर्वी चांद्रयान २ च्या लाँचिंग वेळीही इस्रोचे तत्कालीन प्रमुख त्यांच्या टीमसह मंदिरात दर्शनासाठी आले होते.

चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग झाल्यास भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल. २३ ऑगस्टनंतर कधीही हे यान चंद्रावर उतरू शकते. सुरक्षित लॅण्डिंगसाठी इस्रोने ४ किमी x २.५ किमी इतके क्षेत्र वाढविले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक लॅण्डिंग ठिकाण निश्चित केले आहे, परंतु काही कारणास्तव ते शक्य न झाल्यास नजीकच्या योग्य ठिकाणी ते उतरवण्यात येईल. अतिरिक्त इंधनही उपलब्ध केल्याने यशस्वी लॅण्डिंग होईल, असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला.