थंडी वाढली, धुळ्यात पारा ८.४ अंशावर

जळगाव : कमाल तापमानात घट झाल्यामुळं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातही तापमानात घट झाली आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यातही तापमानात मोठी घट झाली असून आज ८.४ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. ख्रिसमसनंतर म्हणजे २५ डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता.

धुळे शहरासह जिल्ह्याचे १० अंशापर्यंत आलेलं तापमान आज ८.४ वर आलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळं सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. ही थंडी मात्र रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगली आहे. वाढती थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे.

दरम्यान, मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात देखील यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान २० अंशाखाली गेलं आहे. उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. तिथे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसत आहे.