कुऱ्हा काकोडा : मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा-रिगांव शेती शिवारात विज पडून माय-लेक जखमी झाले. मंगळवार, १६ रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरात मंगळवार, १६ रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी कोऱ्हाळा शिवारात रिगांव येथील शोभाबाई साहेबराव बेलदार (५५)आणि मुलगा गोकुळ साहेबराव बेलदार (२७) हे गट नंबर १७३ मध्ये स्वताच्या शेतात काम करीत होते.
जोरदार पाऊस सुरू झाल्याने दोन्ही माय-लेक निंबाच्या झाडाखाली उभे राहिले असता अचानक वीज झाडावर कोसळली. त्यामुळे माय-लेकाला जोराचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले. गोकुळ त्याची आई शोभाबाई जागेवरच बेशुद्ध पडली थोडा शुद्धीवर असलेल्या गोकुळ ने गावात घटनेची माहिती कळवली.
घटनास्थळी तात्काळ गावातील तरुण धावून आले. जखमींना कुऱ्हा येथे आणून ताबडतोब मलकापूर येथे हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. सुदैवानं मायलेक बालंबाल बचावले. जखमी सोबत माजी उपसरपंच अनिल पांडे, रिगांव चे छोटू पाटील, शत्रुघ्न बेलदार, पिंटू बेलदार आदी तरुण मंडळी होती.