पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन घेणं होणार कठीण

नवी दिल्ली : आतापर्यंत बँकांमार्फत पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डावरील लोन घेण्याची प्रक्रिया सुलभ होती. पूर्वी पर्सनल लोनसाठी ग्राहकांची पार्श्वभूमी तपासली जात नव्हती. तसंच काही तारण ठेवण्यासही सांगितलं जात नव्हतं. त्यासाठीचे नियमही फारसे कठोर नव्हते. पण रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनंतर आता पर्सनल लोन घेणं आणि क्रेडिट कार्डावर लोन घेणं कठीण होणार आहेत. कारण आरबीआयने आता नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, ग्राहकांना पर्सनल लोन घेण्यासाठी हमी आवश्यक आहे. सोप्या प्रक्रियेमुळे पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन घेण्याचा कल झपाट्यानं वाढला आहे. यासोबतच अशाप्रकारचं कर्ज बुडवणार्‍यांची संख्याही वाढली आहे. या कर्जांमध्ये ग्राहकांकडून हमीपत्र घेतलं जात नसल्यानं बँकांना तोटा सहन करावा लागला. पण आता रिझर्व्ह बँकेनं एक नियम केला आहे की पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड लोनसाठी ग्राहकांची आर्थिक स्थिती आधी पाहिली जाणार आहे. त्यासोबत हमीपत्र घेणंही आवश्यक आहे.