मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे पोलिसांच्या सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी काय घडलं याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
काय म्हटलंय?
आरोपी चेतन सिंहने टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केल्यानंतर 20 मिनिटांनंतर आणखी एका प्रवाशावर गोळीबार केला. यानंतर आरोपी एक्स्प्रेसच्या एस 5 क्रमांकाच्या डब्यात गेला आणि तिथेही गोळीबार करणार होता. परंतु प्रवाशांनी गोंधळ घातला आणि आरोपी चेतन सिंग गोळीबार न करता तेथून परत गेला. आरोपी चेतन सिंग याने एसआय मीणा यांच्यासह 3 प्रवाशांना का गोळ्या घातल्या, याबाबत सस्पेंस अजूनही जीआरपीसमोर कायम आहे.
एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्यानंतर मीरा रोड ते दहिसर दरम्यान चैन पुलिंग झाल्यानंतर आरोपी चेतन सिंग ट्रेनमधून खाली उतरला. त्यानंतर त्याने पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच माझ्या मुलांची काळजी घे असे सांगितले.
आरोपीची मानसिक स्थिती ठीक आहे की नाही याचाही तपास करण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांचा अंतिम अहवाल अद्याप जीआरपीला प्राप्त झालेला नाही. आरोपी चेतन अजूनही तपासात सहकार्य करत नाही. यामुळे आरोपी चेतन सिंगची नार्को चाचणी होऊ शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस चेतन सिंगची चौकशी करतात, तेव्हा तो तासनतास गप्प राहतो आणि फक्त त्यांच्याकडे पाहतो. काहीही उत्तर देत नाही. आरोपीचे हे वर्तन पाहता पोलीस आता चेतन सिंगची नार्को टेस्ट करण्याचा विचार करत आहेत.