नवी दिल्ली : अयोध्येत बांधण्यात येणार्या राम मंदिराचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, मंदिराचे जवळपास ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. नव्या वर्षात हे मंदिर सामान्यांसाठी खुले केल जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जैशकडून राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यानंतर येथील सुरक्षा अधिक चोख करण्यात आली आहे.
आत्मघातकी बॉम्बच्या माध्यमातून राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचा कट रचल्याचे सांगितले जात असून, दहशतवादी नेपाळमार्गे भारतात आत्मघातकी हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी अयोध्येसह राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये आयडीद्वारे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांच्या या माहितीनंतर आयोध्येतील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.