नवी दिल्ली : भारताला वाटाघाटीच्या स्थितीवर आणण्यासाठी दहशतवादाचा वापर हत्यार म्हणून केला जाऊ शकत नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. एका परिसंवादामध्ये पाकिस्तानसोबतच्या संबंधांबद्दल ते बोलत होते.
एस जयशंकर म्हणाले, “आम्ही हे स्विकारणार नाही. आम्ही कधीही दहशतवादाला चर्चेच्या टेबलावर आणू देणार नाही. आम्हाला सर्वांशी चांगले शेजारी संबंध हवे आहेत. याचा अर्थ माफ करणे किंवा दूर करणे असा नाही. आम्ही अगदी स्पष्ट आहोत.”
“आपल्या सीमा आहेत. आणि आपल्या सीमेवर आव्हाने आहेत. कोविडच्या काळात सीमेवरील आव्हाने तीव्र झाली आहेत. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की आज चीनसोबतच्या संबंधांची स्थिती सामान्य नाही. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) एकतर्फी बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही सहमती देणार नाही”, असं म्हणत जयशंकर यांनी चीनलाही सुनावलं आहे.