Jalgaon News : कपाशीच्या आड गांजाच्या झाडाची लागवड करणे भोवले ! शेतकऱ्याला अटक

जळगाव । कपाशीच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड करणे शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या शेतकऱ्याच्या शेतात कारवाई करीत गांजाची २७ झाडं जप्त केली. ही घटना जळगाव तालुक्यातील भोकर-पळसोद शिवारात घडली असून याप्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीय. प्रकाश दशरथ सोनवणे (५८, रा. भोकर, ता. जळगाव) या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत असे की, तालुक्यातील भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोउनि गणेश सायकर, नयन पाटील, पोहेकों दीपक चौधरी, बापू पाटील, किरण अगोणे, चेतन पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील हे संबंधित शेतात पोहोचले. शेतात कपाशीच्या पिकात गांजाचे २७ झाडं लावलेली आढळून आली. पाच ते सहा फुटांपर्यंत त्यांची वाढ झालेली होती. पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, कृषी अधिकारी अमित भामरे, वजन मापे निरीक्षक अनंत पाटील यांना बोलवून खात्री करीत पंचनामा केला, ही झाडं जप्त करण्यात आली असून १२ किलो वजन व अंदाजे ४० हजार रुपये त्याची किंमत आहे. या प्रकरणी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.