Jalgaon : आई वडिलांपासून विभक्त होऊन संसार थाटला, पण लग्नानंतर दोन महिन्यात उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : जळगाव शहरातील बिबानगर परिसरात 25 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली.  जितेश अनिल राठोड (वय २५ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव असून त्याचे मे महिन्यात लग्न झाले. त्यानंतर आई वडिलांपासून विभक्त होऊन संसार थाटला होता. मात्र लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात त्याने आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जळगाव शहराच्या व्दारकानगरात अनिल रायसिंग राठोड हे पत्नी सगुनाबाई, मुलगा दिलीप आणि जितेश असे कुटुंब राहतात. राठोड कुटुंब मूळ साकळी येथील असून कुटुंबाचा उदरनिर्वाहसाठी जळगाव येथे आले आहेत.

हातमजूरी करून कुटुंबातील सदस्य उदरनिर्वाहास हातभार लावतात.जितेश याचे २२ मे २०२३ रोजी लग्न झाले होते. काही दिवसांनतर त्याने बिबानगरात पत्नीसोबत घर थाटले. रिक्षा चालवून तो प्रपंच चालवत होता.

मात्र  जितेश याने गुरुवारी रात्री साडेबारा वाजता टोकाचा निर्णय घेत गळफास घेतला हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नीने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक लोकांनी माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब मोरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा निरोप कळताच वडिल अनिल राठोड व कुटुंबातील अन्य सदस्यांनी बिबानगरात धाव घेतली. तरूणाचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मोठा आक्रोश केला. जितेश याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.