जळगाव : दरातांडा (ता. चाळीसगाव) येथील शेतातील गोठ्यात बंदिस्त बकऱ्यांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून तीन बकऱ्या ठार केल्याची घटना समोर आली आहे. हिंस्त्र प्राण्याच्या या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली असून पशुधनांवर हे हल्ले करणारा बिबट्याच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून वन विभागाने त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
परिसरात असलेली गिरणा नदी व काहीसा जंगलाचा भाग यामुळे या भागात बिबट्यासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा वावर कायम असतो. या भागात आतापर्यंत अनेकदा बिबट्यानेच पशुधनांवर हल्ले केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरातांडा येथील साईलाल लक्ष्मण राठोड यांचे डोंगऱ्याच्या कडेला असलेल्या शेतातील गोठ्यात पाच बकऱ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बंदिस्त जाळीच्या खालून बिबट्याने पायाच्या नखांनी माती कोरून जाळीच्या आत प्रवेश केला व तीन बकऱ्यांचा फडशा पाडला. बिबट्याच्या हल्ल्यात एक बकरी जखमी झाल्याचे दिसून आले.
आज पहाटे नेहमीप्रमाणे प्रसाद राठोड हे शेतात गेले असता, त्यांच्या या प्रकार लक्षात आला. हा हल्ला नेमका बिबट्यानेच केल्याच्या वृत्ताला वन विभागाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी हे हल्ले बिबट्याच करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वनविभागाकडून पंचनामा
बकऱ्यांचा फडशा पाडल्याची माहिती तांड्यावर कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरातांडा ही अवघ्या १५ ते २० घरांची लोकवस्ती आहे. या हल्ल्यामुळे सर्व रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. वन विभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतर वनपाल श्रीराम राजपूत येऊन घटनेचा पंचनामा केला.