जळगाव : महापालिकेच्या ‘अमृत योजना’ पूर्ण झालेल्या भागांत नागरिकांना नळजोडणी देऊन ते झोन त्वरित कार्यान्वित करा, मुख्य रस्त्यांवरील डागडुजी सुरू करा, नाले सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, असे आदेश आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
सतरा मजली इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या दालनाशेजारील सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार भोळे यांनी महापालिकेच्या संपूर्ण कामाचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. सुरू असलेली कामे कुठपर्यंत आली आहेत, याची माहितीही घेतली.
शहरातील सर्व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करून घ्यावी, यासाठी आवश्यक असल्यास पोकलेन भाडेतत्वावर घेऊन तातडीने ही कामे पूर्ण करण्यात यावीत. शहरात काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, काही मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून अपघाताचा धोका आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करा, असे आदेशही आमदार भोळे यांनी दिले.
शहरातील घनकचरा प्रकल्पाच्या कामाचा पेच निर्माण झाला आहे. घनकचरा प्रकल्पासाठी १२ कोटी मंजूर आहेत. जुन्या दराने काम करून घ्यावे. संबंधित मक्तेदाराशी बोलणी करून त्याबाबत तातडीने त्याला आदेश द्यावेत, असेही आमदार भोळे यांनी सूचविले.
महापालिकेच्या नोकरभरतीच्या आकृतिबंधास मंजुरीसाठी आपण प्रयत्न करीत आहोत. महापालिकेची बिंदू नामावली मंजूर करण्यात येईल. त्यानंतर महापालिकेत नोकरभरती करण्यात येईल.
मेहरुण तलावाच्या पाण्यावर प्रक्रिया
मेहरुण तलावातील पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाचा प्रस्ताव महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिला. मेहरुण तलावाच्या आजूबाजूला निवासस्थाने झाली आहेत. त्याचे सांडपाणी तलावात जात आहे. त्यामुळे तलावातील पाणी खराब होत असून, त्यातील पक्षी व प्राण्यांना धोका आहे. त्यामुळे या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३० कोटी रूपये आवश्यक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करावा, अशी मागणी महापौर व उपमहापौरांनी केली. त्यावर आमदार भोळे यांनी शासनदरबारी आपण हा प्रश्न उपस्थित करून लवकरच निधी मंजूर करून आणणार असल्याचे सांगितले.