Jalgaon : लाच प्रकरणात अटकेत असलेल्या बीएचआरच्या अवसायकाच्या घरातून रोकड जप्त

जळगाव । दीड लाख रुपयाच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या जळगाव येथील बीएचआरच्या अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे याच्या घराची झडती घेऊन १ लाख ८० हजारांची रोकड जप्त केल्याचे एसीबीचे निरीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले

तक्रारदार कर्जदाराने घेतलेल्या २२ लाख कर्ज परतफेडीत ओटीएस योजना लागू करण्यासाठी अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे यांच्यासह वसुली अधिकारी सुनील पाटील यांना दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना ३ सप्टेंबर रोजी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. एसीबीने बुधवारी सुनील पाटील याच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून ८.१२ लाखांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी दोघांना न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

अद्याप तपासणी बाकी नासरे याने ओटीएस योजना राबवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आतापर्यंत ५० कर्जदारांना त्याचा लाभ दिला आहे. त्यांच्याकडूनही लाच घेतली आहे का?, सुनील पाटील याच्या ड्रॉवरमधील ८.१२ लाखांची रोकड कोणाकडून आली. तालुका निबंधकांचा अतिरिक्त पदभार असलेल्या नासरेंनी तेथेही कोणाकोणाकडून लाच घेतली. नासरे व सुनील पाटील यांनी किती अपसंपदा बैंक लॉकरमध्ये ठेवली आहे आणि जमीन, प्लॉट, शेअर्समध्ये गुंतवली आहे. त्यांना भेट देणाऱ्यांच्या रजिस्टरची पडताळणी आदींची तपासणी एसीबीला करणे बाकी आहे