जळगाव । जळगाव-धुळे रस्त्यावर असलेला टोलनाका आजपासून सुरु होणार होता, मात्र त्यापूर्वीच मध्यरात्री बुरखाधारी तरुणांनी टोलनाक्याची तोडफोड करून पेटवून दिल्याची घटना समोर आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून हल्लेखोर तरुणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा हा टोल नाका होता. जळगाव-धुळे रस्त्यावर असलेला सब गव्हाण येथील हा टोल नाका आजपासून सुरु केला जाणार होता. याची सर्व तयारी झाली होती. उद्घाटन झाल्यावर हा टोल नाका वसुलीसाठी सुरु करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच मध्यरात्री चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात बुरखाधारी तरुणांनी टोलनाका तोडफोड करून पेटून दिला आहे.
जेव्हा ही घटना घडली त्यावेळी काही कर्मचारी टोल परिसरात झोपले होते. टोलवर आग लागल्याचं दिसताच त्यांनी पोलिसांना कळवले. या सर्व घटनेत टोल कंपनीचे अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. तसेच, सीसीटीव्ही कैद झालेल्या तरुणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.