Jalgaon : सोने-चांदीने उभारली दरवाढीची गुडी ; भाव वाचून ग्राहक हैराण

जळगाव । सध्या सोने आणि चांदीच्या किमतीने दरवाढीची गुडी उभारली आहे. गुढीपाडव्यापूर्वीच दोन्ही धातूंचे दर सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेले आहे. दरम्यान, जळगावच्या सुवर्णपेठेत शनिवारी सोन्यात ८५० रुपयांची तर चांदीत ५०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. यामुळे शनिवारी दोघांनी विक्रमी पातळी गाठली. सोने ७११०० (जीएसटीसह ७३२३३) रुपये तोळा तर चांदीचे प्रति किलोचे दर ८०००० (जीएसटीसह८२४००) वर पोहचले.

गेल्या काही दिवसांपासून देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात केवळ सोन्याचे भाव वाढत असताना आता सोन्यासह चांदीच्याही भावात मोठी वाढ सुरू झाली असून दोघांमध्ये भाववाढीची सध्या स्पर्धा दिसून येत आहे.

तीन दिवसांपूर्वीच गुरुवार, ४ एप्रिल रोजी सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर शुक्रवार, ५ एप्रिल रोजी त्यात २५० रुपयांची वाढ झाली व ते ७० हजार २५० रुपये प्रति तोळा झाले. शनिवारी ही वाढ कायम राहत त्यात पुन्हा ८५० रुपयांची वाढ झाली व सोन्याने ७१ हजारांचाही पल्ला ओलांडून ते ७१ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले.

दुसरीकडे गेल्या आठवड्यापासून भाववाढ सुरू झालेल्या चांदीच्याही भावात तीन दिवसांत मोठी वाढ झाली. गुरुवार, ४ एप्रिल रोजी ७९ हजार २०० रुपये प्रति किलोवर चांदी पोहोचली होती. शुक्रवार, ४ एप्रिल रोजी त्यात ५०० रुपयांची आणि शनिवार, ६ एप्रिल रोजी तर थेट एक हजार ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८० हजार रुपयांच्या पुढे जात ८० हजार ९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. यापूर्वी अनेक वेळा चांदी ७७ व ७८ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. मात्र, ४ एप्रिलला ७९ हजार व आता ६ एप्रिल रोजी ८० हजार हा चांदीचा मोठा पल्ला गाठला. तर जीएसटीसह ८२, ४०० रुपयावर पोहोचले आहे.