जळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेतर्फे २७ रोजी सायंकाळी शहरात ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला सारून केवळ ’हिंदू’ म्हणून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले. या दिंडीत भगवेधारी महिला, पुरुष, शंख, तुतारी नाद, टाळ मृदुंगाचा गजर अशा भक्तिसह लाठी-काठी, दंडसाखळी, दांडपट्टा यांची शौर्य जागृतीपर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामुळे भक्ती आणि शौर्याचा संगम या दिंडीत अनुभवायला आला.
इस्कॉन सांप्रदायाचे जीवनदास महाराज, समवेत सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून नेहरूचौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन अधिवक्ता भरत देशमुख यांच्या हस्ते श्रीरामाच्या पालखीचे पूजन नूतन मराठा महविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. पौरोहित्य भूषण मुळ्ये यांनी केले. शास्त्री (टॉवर) चौक, चित्रा चौक या मार्गे शिवतीर्थ मैदान येथील चौकात समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमात सनातनचे सद्गुरू नंदकुमार जाधव, महाराष्ट्र – गोवा बार असोसिएशनचे माजी चेअरमन अधिवक्ता भरत देशमुख, योग वेदांत सेवा समिती, जळगावचे जिल्हा कार्यकारी अनिल चौधरी यांनी विचार मांडले. या दिडीत इस्कॉन, योग वेदांत सेवा समिती, जय गुरुदेव, चैतन्यबापू संप्रदाय, वारकरी संप्रदाय, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान, हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वादी संघटना, समितींनी सहभाग नोंदविला होता.
शास्त्री (टॉवर) चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यात लाठीकाठी, दंडसाखळी, कराटे, दांडपट्टा यांची शौर्य जागृतीपर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
पथकांचा सहभाग
दिंडीत संत, क्रांतिवीर आणि राष्ट्रपुरुष यांच्या वेशभूषा केलेल्या आणि प्रभावी संदेश देणार्या बालकांचे पथक, छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केलेले अश्वपथक, मशालधारी, गदाधारी मावळे, शंखनाद पथक, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, स्वसंरक्षण प्रात्यक्षिक पथक, ढोल पथक, श्रीराम रथ, वारकरी पथक, कलश, तुळसधारी महिला पथक, ध्वज पथक, आपत्कालीन पथक, प्रथमोपचार पथक, शिरसोली येथील लेझीम पथक, शिरसोली, लाडली, येथील वारकरी पथक, छत्री पथक, योग वेदांत समिती रथ, वीर सावरकर रथ, टाळ नृत्य पथक, रणरागिणी पथक आदी पथकांनी सहभाग नोंदविला. फेरीच्या मार्गात शास्त्री चौक येथे शंकर तलरेजा आणि ऑटो रिक्षा चालक, चित्रा चौकात शिवपंचायतन देवस्थान समिती, गोलाणी मार्केट हनुमान मंदिर येथे मंडीराम सोनी, कोर्ट चौक येथे मनोहर चौधरी यांच्या वतीने पूजन करण्यात आले. रॅलीत आमदार सुरेश भोळे, माजी महापौर सीमा भोळे, शोभा चौधरी आदी उपस्थित होते.
हिंदू एकता दिंडी हिंदू राष्ट्र स्थापनेची नांदी : नंदकुमार जाधव
हिंदूमधील छात्र तेज, शौर्य जागृत व्हावे, तसेच हिंदू जागृत व्हावा, यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही हिंदू एकता रॅली हिंदू राष्ट्र स्थापनेची नांदी असल्याचे प्रतिपादन सनातन धर्माचे धर्म प्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी केले. ते पुढे म्हणाले की, हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावा यासाठी हिंदू संघटनाचे कार्य सुरू आहे. त्यासाठी २५० हिंदुत्वादी संघटना एकत्र काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावी. यावर्षी होणारे हिंदू राष्ट्र अधिवेशन वैश्चिक हिंदू राष्ट्र अधिवेशन व्हावे,असाही मानस त्यांनी व्यक्त केला. हिंदू राष्ट्र अधिवेशनात नेपाळ, श्रीलंका आदी देशातील हिंदू बांधव सहभागी होणार असल्याचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले. हिंदू एकता दिंडीत अतिशय उत्साह होता. लहानपणापासून आई आमची गुरू होती आणि आता गुरूवर्य आमचे गुरू झालेत. याची प्रेरणा जी प्रेरणा मिळाली, त्याप्ररेणेने मी आजच्या सुदिनी या दिंडीत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभल्याचे महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी चेअरमन अधिवक्ता भरत देशमुख यांनी सांगितले.