जळगाव । जळगाव शहरात आज शनिवार, 25 जानेवारी रोजी सकाळी एक भीषण अपघात घटला, ज्यामध्ये एक तरुण जागीच ठार झाला आणि तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ घडली.
अपघाताच्या वेळी विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर (एमएच १९ एएन २९०६)ला मागून येणाऱ्या भरधाव डंपरने ओव्हरटेक करत असताना कट मारला, ज्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाली. यात ट्रॅक्टर खाली दाबला गेलेला अंकुश आत्माराम भिल (वय-२७, रा. डिकसाई ताम, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल (वय-२२), गणेश भगीरथ भिल (वय-१८), आणि शुभम सुखा भिल (वय -२०) हे तिघे जण जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्या तिघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतले आणि डंपर ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मयत अंकुशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जळगाव शहरात मागील काही दिवसात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यात अनेकांचा जीव गेला आहे.