जळगाव : येथील प्रशस्त जळगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी ५.२० हेक्टर आर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला होता. शासनाने या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली असून विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.
जळगाव विमानतळाची मूळ जमीन ४१ हेक्टर होती. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे कुसुंबा आणि मौजे नशिराबाद येथील २५० हेक्टर जमीन संपादित करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला मान्यता देण्यात आली होती. मात्र कंपनीने २६२ हेक्टर ५९ आर जमीन संपादित केली. शासनाची मान्यता न घेता संपादित करण्यात आलेली अतिरिक्त १२ हेक्टर ५९ आर क्षेत्रास कार्येतर मान्यता देणे आणि विमानतळ विस्तारीकरणासाठी ५ हे. २० आर जमिनीचे क्षेत्र संपादन करणे. त्यानुसार संपादित झालेल्या क्षेत्राचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून शासनाकडे पाठविला होता.
या प्रस्तावाला शक्तत्र प्रदत्त समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. नव्याने संपादित करण्यात येणाऱ्या ५ हेक्टर २० आर क्षेत्रापैकी १ हेक्टर ३९ आर शासकीय जमीन विना मोबदला अथवा नाममात्र १ रु. दराने जिल्हाधिकाऱ्यांकडून विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता मिळाली आहे. विमानतळ विस्ताराकामी खासगी जमीन संपादनासाठी ३७ कोटी ५० लाख रुपयांचे सहायक अनुदान मंजूर करण्यात आले आहे.