Jalgaon Ambulance Blast । एक ठिणगी अन् होत्याचं नव्हतं; पण चालकाचे होतेय कौतुक

Jalgaon Ambulance Blast । प्रसूत महिला व तिच्या नवजात बाळाला घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ ते ९,३० वाजेदरम्यान महामार्गावरील दादावाडीजवळच्या उडाणपुलावर घडली. या अपघातात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे तुकडे दीडशे फूट उंच उडाले, तर तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. चालकाच्या समयसूचकतेमुळे सुदैवाने रुग्णवाहिकेमधील रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले असल्याने चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्फोट का झाला ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ रुग्णवाहिका मनिषा रवींद्र सोनवणे (भिल) (२५, रा. बामणे, ता. एरंडोल) या प्रसूत महिलेसह तिच्या बाळाला घेऊन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात येत होती. त्यावेळी महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गियर बदल करीत असताना आगीची ठिणगी उडाली. काही तरी गडबड असल्याचा अंदाज आल्याने चालक राहुल बाविस्कर याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले.

वाहनातील डॉ. रफिक अन्सारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांना खाली उतरविले. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या रुग्णवाहिकामध्ये बसवून त्यांना रुग्णालयात स्वाना केले. हे वाहन पूढे जाताच रुग्णवाहिकामधील ऑक्सिजन सिलिंडरचा जोरात स्फोट झाला. क्षणातच वाहनाच्या बिंधड्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलिंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलिंडर रस्त्याच्या दुसन्या कडेला तर रिकामे असलेले सिलिंडर वाहनाजवळ पडले. पुलाच्या खाली वाहनाचा पत्रा उडाला. तर चालकाच्या समयसूचकतेमुळे सुदैवाने रुग्णवाहिकेमधील रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले आहेत.

दुपारी अमित शाहांच्या ताफ्यात होती रुग्णवाहिका
ज्या रुग्णवाहिकेचा स्फोट झाला ती काल दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात होती, अशी माहिती १०८ चे व्यवस्थापक राहुल जैन यांनी दिली. सुदैवाने त्यावेळी काही घटना घडली नाही. एक सिलिंडर ऑक्सिजनने भरलेले होते तर दुसरे रिकामे होते. भरलेल्या सिलिंडरचे स्फोटमुळे तुकडे तुकडे झाले आहेत.