---Advertisement---
जळगाव : हावडा-मुंबई मेलमधून प्रवास करणाऱ्या सोन्याच्या व्यापाऱ्याचे २ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने असणारी बॅग चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर ओमप्रकाश वर्मा (वय ४४ रा. गणपतीनगर, जळगाव) हे सोन्याचा चिल्लर व ठोक व्यवसाय करतात. गेल्या २५ वर्षापासून ते या व्यवसायात आहे. रविवारी सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेसने ते अमरावतीमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे सॅम्पल विक्रीसाठी घेऊन सराफा व्यापाऱ्यांकडे आले होते.
दिवसभर व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर सायंकाळी ७ वाजता जळगावला जाण्यासाठी हावडा मुंबई -मेलमध्ये बडनेरा रेल्वे स्थानकावरून चढले. सदर व्यापारी गाडीच्या समोरील भागात असणाऱ्या जनरल डब्यात बसले.
गाडीत बरीच गर्दी होती त्यांनी त्यांच्या पाठीला लटकवलेली सोन्याच्या दागिन्यांची निळ्या रंगाची बॅग डब्यातील लगेज असणाऱ्या रॅकवर ठेवली. एका मिनिटांच्या आत चोरट्याने दागिने असलेली बॅग घेऊन पसार झाला.
तीन टीम चोरट्यांच्या शोधकार्यात
२ कोटी ११ लाख ८०० रुपयांचे हे दागिने असल्याचे तक्रारीत नमूद आहे. घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला, लगेचच पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासासाठी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांच्या तीन टीम चोरट्यांच्या शोधकार्यात लागल्या आहेत.