राजेंद्र आर.पाटील
Jalgaon crime : ऑनलाईन व्यवहार सर्वत्र होवू लागल्याने या क्षेत्रात सायबर ठगांनी धुमाकूळ घातला आहे. 2024 वर्षाच्या जानेवारी आणि
फेब्रुवारी अशा दोन महिन्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त फायदा मिळावा, असे अमिष दाखवित जळगाव जिल्ह्यातील 15 जणांना 1 कोटी 15 लाख 65 हजार 355 रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सायबर पोलीस ठाण्याच्या दाखल गुन्ह्यातून ही आकडेवारी समोर आली. तर सायबर पोलिसांनी तपासातून 5 लाख 64 हजार इतकी रक्कम हस्तगत केली आहे. जानेवारी महिन्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात संशयित ठग सायबर पोलिसांच्या हाती लागल्याने या एका गुन्ह्यात 100 टक्के रिकव्हरी करण्यात पथक सफल झाले.
गेल्या 2023 या वर्षात विमा पॉलिसीत कमी वेळेत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष सायबर ठगांनी ग्राहकांना दाखविले. कमी वेळेत जास्त नफा मिळत असल्याच्या भावनेतून गुंतवणूक केलेल्या जळगाव जिल्ह्यातील 54 ग्राहकांना 1 कोटी 13 लाख 27 हजार 587 रुपये ऑनलाईन पध्दतीने रक्कमा स्विकारत सायबर ठगांनी फसवणूक केली. सायबर पोलिसांनी तपासातून सुमारे 53 लाख 89 हजार 300 इतकी रक्कम ठगांकडून हस्तगत केली. गेल्या वर्षी दाखल गुन्ह्े तपासावर असले तरी सायबर ठग खरी ओळख लपविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात. त्यात प्रामुख्याने दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डाचा खुबीने वापर करत हे ठग पोलिसांना चकमा देत आहेत. अशा प्रकारात सायबर पथक संशयिताच्या ओळखीच्या आधारावर त्याच्या गावापर्यत पोहोचतात खरे. मात्र सदर व्यक्ती ही वेगळीच असल्याचे निष्पन्न होते. यात पथकाचा वेळ, खर्च आणि निरर्थक शक्तीचा ऱ्हास होतो, हे सांगायला नको.
पॉलिसी फॉर्म्युला आहे असा
काही ग्राहकांनी ऑनलाईन पॉलीस घेतली होती. अशा ग्राहकांची माहिती काढत सायबर ठगांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून विमा कंपनीतून बोलत असल्याचा बहाणा केला. आपल्या विमा पॉलीसीवर बोनस मिळेल, मेडिकल कव्हरही मिळेल. यातून दहा ते बारा लाखाचा फायदा होईल,अशी भन्नाट योजना ग्राहकांच्या मनात उतरविली. टप्याटप्याने ग्राहकांकडून सायबर ठग रक्कमा घेतात. काही तरी कारण सांगत पुन्हा ग्राहकांकडून पैश्यांची मागणी ते करतात. जे ग्राहक पैसे देत नाहीत त्यांना सायबर ठग बेदखल करतात. ठगांनी सांगितलेली कंपनी बनावट असल्याचे समोर येते. ठगांचे फोन लागत नाहीत. तेव्हा फसवणूक झाल्याची ग्राहकाची खात्री होते. बँक खाते रिकामे झाल्यानंतर ग्राहक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतात.
शेअर मार्केटचा आधार घेत ग्राहकांना जाळ्यात घेण्याचा अफलातून फंडा सायबर ठगांनी नव्या वर्षात आणला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, झटपट जास्त नफा कमवा असे ग्राहकांना सांगत ते विविध कंपन्याचे नाव घेत शेअर मार्केटविषयी ग्राहकांना माहिती देतात. जी सगळी बनवाबनव असते. पुन्हा पुन्हा मोबाईलवरुन संपर्क साधत ते ग्राहकांना आर्थिक लाभ कसा होईल, याविषयी खोटे पण नेटाने ते खरे असल्याचे भासवित ग्राहकांना पटवून देण्याच्यासाठी खटाटोप करतात. ग्राहकाचा विश्वास संपादन केल्याबरोबर त्यांची फसवणुक करण्याची योजना हळू हळू साकार होत जाते. ग्राहक जाळ्यात येताच मग ऑनलाईन पैसे गुंतवणूक करण्याला सुरुवात करतो. या योजनेत पैसे ग्राहक गुंतवितच राहतो. ज्यावेळी पैसे घेण्याची वेळ येते, तेव्हा सायबर ठग संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेले असतात. अशा पध्दतीने जिल्ह्यात 15 लोकांची सायबर ठगांनी फसवणूक केली आहे.
सायबर ठग लोकांना फसविण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचा फंडा वापरत असतात. या ठगांच्या साथीदारांचे मोठे नेटवर्क सायबर संकेतस्थळावर कार्यरत आहे. फिशिंग ईमेल, बनावट वेबसाईट, चुकीची व दिशाभूल महितीचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणे, न्यूड व्हिडीओच्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी हे ठग ग्राहकांवर नजरा ठेवून असतात. बनावट पध्दत प्लॅटफॉर्मचा खुबीने वापर करतात.
कॉलवर विश्वास ठेवू नका
पॉलिसी म्यॅचुअर झाली आहे, त्यावर अधिक बोनस मिळेल, मेडीक्लेम सुविधा मिळतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळवा अशा प्रकारचे मेसेज, कॉल यावर विश्वास ठेवून कोणतीही रक्कम भरू नये. स्वत:च्या नावाचे बँक खाते तसेच बँक खात्याची माहिती इतर कुणालाही देवू नये अथवा शेअर करू नये. त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्तींना आपले आधारकार्ड, पॅनकार्ड, ई मेल आयडीची माहिती शेअर करू नये. आपणास कोणी बँक खाते उघडून कमिशन बेसवर वापरण्यास सांगत असेल तर आपण तत्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. तसेच सायबर फ्रॉड झाल्यास तत्काळ 1930 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
– किसनराव नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, जळगाव