Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे ३१ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी पत्नीला अटक करण्यात आली असून, भडगाव पोलीस ठाण्यात प्रियकरासह पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला. किशोर शिवाजी पाटील ( ४५, रा. पाळासखेडे ता. भडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी जि.पुणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून अनेक वेळा किशोर पाटील आणि पत्नी यांच्यात वाद होत होते.
दरम्यान, अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नीने ठरविले. त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने नियोजन केले. यात प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले.
किशोर पाटील हे शनिवार, ३० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघून गेले. आगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके यांने अपघाताचा बनाव करून किशोर पाटील यांना ठार केले. हा प्रकार रविवार, ३१ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलीसांनी पत्नीला ताब्यात घेतले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.