Jalgaon Crime News : शेतकर्‍यांना गंडविणारे अखेर सापडलेच; एक वर्षापासून पोलिसांना देत होते गुंगारा

Jalgaon Crime News :  शेतकऱ्यांना ३४ लाखांत गंडविणाऱ्या कापूस व्यापाऱ्याला पत्नी व मुलासह तब्बल एक वर्षानंतर अटक करण्यात आली. एक वर्षापासून हे तीनही जण पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर त्यांना पकडण्यात मेहुणबारे (ता.चाळीसगाव) पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कापूस व्यापारी पंडित ब्राम्हणकर याने मुलगा चेतन व रूपेश ब्राम्हणकर तसेच पत्नी छायाबाई यांच्या मदतीने खेडगाव-जामदा (ता.चाळीसगाव) परिसरातील २५-३० शेतकऱ्यांकडून ४९० क्विंटल कापूस उधारीवर खरेदी केला होता.

मात्र, बराच कालावधी उलटूनही त्याने शेतकऱ्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १७ शेतकऱ्यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी जितेंद्र सुपडू महाले (रा. जामदा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार वरील चार संशयितांविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात ६ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे चारही जण फरार होते.

मेहुणबारे पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक प्रवीण दातारे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली. त्यांनी लागलीच पोलिसांचे पथक संशयितांच्या शोधासाठी पाठवले. फौजदार सुहास आव्हाड, पोकॉ. गोकुळ सोनवणे व नीलेश लोहार यांच्या पथकाने पुण्यात जाऊन वरील संशयितांना अटक केली.