जळगाव : अमळनेर तालुक्यातील धुपी येथे एका शेतकऱ्याचे बंद घरफोडून चोरटयांनी ५ लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवार, ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. तर चाळीसगावातील एका महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे सांगून, ठगांनी ८ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुभाष श्रीराम जाधव (५७ रा. धुपी ता. अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ७ जून ते ११ जून दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कूलूप तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ५ लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीला आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख हे करीत आहे.
चाळीसगाव शहरातील विवेकानंद कॉलनी भागात वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षीय महिला ही खाजगी नोकरी करते. ११ रोजी त्यांच्या व्हॉटसॲप वरुन फोन आला. त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव अनिल यादव सांगत, तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच संबधित महिला एका गुन्ह्यात अडकली असल्याचे सांगितले. सुरुवातीला महिलेने या कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर पुन्हा सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला, तसेच संबधित व्यक्तीने देखील आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र महिला घाबरली, काही वेळानंतर हे फोन येतच राहिले. तसेच ज्या गुन्ह्यात ती महिला अडकली असल्याचे तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात महिलेला ३ वर्षाची शिक्षा होणार असल्याचीही धमकी संबधितांनी दिली.
तसेच या शिक्षेपासून वाचायचे असल्यास ऑनलाईन पध्दतीने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली. यानंतर घाबरलेल्या महिलेने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम नकली सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबधित महिलेने त्या दोघांना फोन केला. मात्र, दोघांचे फोन नंबर बंद आले. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, संबधित महिलेने सायबर पोलिस ठाण्यात सीबीआयचे आधिकारी सांगणाऱ्या दोन्ही अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला.