तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२२ । चोरट्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली असून चक्क पोलीस मुख्यालय आवारातील पोलीस कवायत मैदानावर पायी फिरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारीला चाकूचा धाक दाखवून तिची सोन्याची चैन लांबवल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावात खून, चोरी, हाणामारी हे तर नेहमीच घडणारे प्रकार आहेत. दररोज कुठे ना कुठे चोरी आणि घरफोडीचे प्रकार घडत असतात. जळगावातील पोलीस मुख्यालय लगत असलेल्या पोलीस कवायत मैदानावरून एका महिला पोलिसाची सोनसाखळी लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला पोलीस कर्मचारी आरती मोतीलाल कुमावत वय-३२ वर्ष या पोलीस वसाहतीत वास्तव्याला आहेत. गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास त्या पोलीस मुख्यालयातील मुख्य परेड ग्राउंडवर पायी फिरत होत्या.
पोलीस कवायत मैदानावर असलेल्या अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकवली आणि पळ काढला. चोरट्याच्या झटापटीत त्या जखमी देखील झाल्या. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.